Tuesday, March 12, 2024

नावात काय आहे?


मुंबई च्या 7 स्टेशन ची नावे बदलली. त्यावर एका मित्राची  काॕमेंट आली, "अरे अजून इतक्या वर्षांनंतरही मी CST ला VT च म्हणतो".


त्यावर लक्षात आले, CST चे तर जाऊच दे, अजूनही कित्येक लोक बाँम्बे, बँड्रा, वगैरे म्हणतात त्याला काय म्हणावे! ब्रिटिशांचा व हिंदी भाषिकांचा (नको इतका फाजील ) प्रभाव.


पण म्हणावेसे वाटले, की तुमची पुढची पिढी मात्र नवीन नावच उच्चारेल कारण त्यांनी तेच ऐकले आहे.


मी मुंबईत आल्यावर सांताक्रूज जवळ एका क्लास ला जात होते. ते नाव चांगलेच तोंडात ही बसले. नंतर जाॕब लागल्यावर कोणीतरी म्हटले, " मी सँटाक्रोज ला राहतो." ऐकताना एकदम विचित्र वाटले. कदाचित इंग्रजी शब्दाचा तो उच्चार योग्य असेल ही, पण स्टेशनचे नाव मात्र "सांताक्रूज" च पटत होते कारण तेच रोज वाचले होते.


"संभाजीनगर"ला अट्टाहासाने "औरंगाबाद" म्हणणारे, "प्रयागराज"ला अट्टाहासाने "अलाहाबाद" म्हणणारे लोक आहेतच.


"नगर" चे एक बरे आहे. त्याला खूप वर्षांपासून "अहमदनगर" असेही फारसे कुणी म्हणत नव्हते तर  आता "अहिल्यानगर" हे नाव ही कोणाच्या लक्षात राहिले नसेलच. त्याचे नाव आपले नुसते "नगर" च. काही शहरांची नावे मात्र सदा सर्वकाळापासून असलेली नसलेली सर्व नावे समजूतदार लोक समजून घेतात. तुम्ही "बडोदा/वदोडा/ वडोदा/ वडोदरा/बडोदरा" काही महटले तरी लोकांना कळते. तसे, "बनारस/वनारस/वाराणसी/वाराणशी/ काशी"   काही ही म्हटले तरी कालमानाच्या पलिकडे जाऊन लोक बापडे समजून घेतात. 


पण आपल्या नावाबद्दल जसा आपल्याला अभिमान असतो तसा गावांच्या नावाबद्दल ही असतोच की. पुण्याचे काॕस्मोपाॕलिटियन रूप झाल्या पासून तर गावांच्या नावाच्या नुसत्या चिछड्या उडाल्या आहेत. ते ऐकताना अगदी कानावर तप्त रस पडल्यासारखे वाटते.


"हिंजव डी" ला "हिंजे वाडी", "बाणेर" चा बाणेदार पणा जाऊन मुळमुळीत "बानेर", "येरव डा" चे "येर वाडा", औंध ( अऊँध असा उच्चार मराठीत आहे) पण त्याचे हिंदी भाषिकांनी केलेले "आॕन्ध", "सातारा" चे "सतारा", मुबलक विहीरींचे / बाव असलेले "बाव धन" चे  एकदम सावधान म्हटल्या सारखे "बावधान", एक ना दोन. शब्द उच्चारताना कुठे तोडावा ह्याचे एक स्थानिक गणित असते. आता "हडप सर" ला उच्चारताना "हड पसर" म्हटले तर चालेल का?


 पण नवीन नावे तोंडात बसायला अंमळ वेळ लागतोच. जर लग्न ठरण्याच्या आधीपासून होणारी सून घरी येतजात असेल, परिचयाची असेल तर, लग्न झाल्यावर तुम्ही कितीही नाव बिव बदला, बहुतांशी लोक जुन्याच नावाने हाक मारतात. आणि माहेरचे आणि सासरचे लोक तर हमखास आपापले ठेवलेले नाव घट्ट धरून बसतात.


कधीकधी असे खास कारण नसते पण जुने नाव तोंडात बसलेले असते म्हणून आपण म्हणत राहतो. आपण ही कलकत्ता म्हणतोच की. अजून कोलकाता किंवा बंगळुरु वगैरे तोंडात बसत नाही. 


मात्र "मद्रास" म्हणणे सुटले आहे. Thanks to "Chennai express" आणि Chennai super kings😀


शेक्सपियर म्हणतो नावात काय आहे? तर महाराजा, नावातच सर्व काही आहे.


त्या त्या नावाबद्दल आत्मीयता वाटल्या शिवाय माणसे आपणहून नाव उच्चारत नाहीत. नाहीतर चांगल्या रमेश, सुरेश, शुभांगी चे बंट्या, बाळ्या, पिंटी होते.


आमचे एकजण ओळखीचे होते. ते नावावरून भविष्य सांगायचे. ते नेहमी म्हणत, "नाव बदला म्हणजे माणसाचा, शहराचा, देशाचाही, स्वभाव, चेहरामोहरा बदलेल".


प्रत्येक जेत्याला शहरांची नावे बदलावीशी वाटतात कारण त्यानंतर त्याची जुनी ओळख पुसली जाणार असते. हे राजरोस पणे होते. ( हेर बीर लोकांसारखे लपून छपून नाव बदलावे लागत नाही.) त्यामुळे नव्या राज्यकर्त्यांचा जनमानसावर ठसा उमटवणे, नव्या सत्ते विषयी अभिमान व निष्ठा जागृत करणे सोपे जाते. एक नवा इतिहास त्या त्या शहराला, देशाला नवीन नावाने इतिहासाच्या पुस्तकात स्थान देणार असतो. कधी पारतंत्र्यांच्या खुणा पुसून टाकायच्या असतात व नवीन टीम, नवा अभिमान वाढवायचा असतो.


 इतकेच कशाला अगदी एखाद्या कंपनीत ली छोटी शी डिविजन/ युनीट एका मॕनेजर कडून दुसऱ्या मॕनेजर कडे गेले की खूपदा त्या डिव्हीजन चे नाव बदलले जाते. त्या युनीटचे भविष्य बदलण्याचा एक छोटासा प्रयोग च म्हणा ना.


तर असे हे नाव पुराण व नावांची महती.


-सुवर्णा

13-3-2024

No comments:

Post a Comment

हिंजवडी, कॅब आणि प्रवासी

  हिंजवडी, कॅब आणि प्रवासी हिंजवडी च्या  IT कामगारांना रिक्षा आणि टॅक्सी वाल्यांनी अव्वा च्या सव्वा पैसे लावून अनेक वर्षे लुटले. 1 km यायलां...