Saturday, March 16, 2024

नोस्टालजिया - समाजात हा बदल झालाय

 नाँस्टालजिया - समाजात हा बदल झालाय


“समाजात हा बदल कधी झाला”/ समाजात बदल का झाला/ काळ बदललाय / गेले ते सुंदर दिवस/ अमुक तमुक करणारी आमचीच शेवटची पिढी”  हे आणि असे काही लेख सोशल मिडियावर वेगवेगळ्या प्लॕटफाॕर्म वर बर्याचदा दिसतात व खूप दिवस फिरताना दिसतात. 


बदल झालाय हे खरंय. ह्यात चांगल्या आणि चांगल्या नसलेल्या अशा दोन्ही बाजू आहेत. 


मुलांनी स्वतः च्या पायावर उभे राहून त्यांना स्वतंत्र निर्णय घेण्याची क्षमता, स्वतंत्र  planning / आखणी करण्याची क्षमता व जबाबदाऱ्या पेलण्याची क्षमता त्यांच्यात यावी म्हणून तर आपण त्यांना लहानपणापासून तयार करत असतो. अगदी चिमणी सुद्धा आपल्या पिल्लांना त्यांच्या पंखात बळ येऊन त्यांना उडता यावे म्हणून प्रयत्न करत असते. एकदा पाखरे उडून गेली की पुन्हा बळजबरीने त्याच जुन्या घरट्यात त्याने राहावे अशी अपेक्षा पक्षी करत नाही. गरुडासारखे पक्षी तर कठोर मातृत्व दाखवतात. गरुडाची आई तान्ह्या पिल्लाला चोचीत धरून खूप उंचावर नेते आणि झटक्यात सोडून देते. ते बिचारे कोवळे पिल्लू भेलकांडत खाली खाली येते. अगदी जमिनीवर टेकण्या आधी पक्षिण परत त्याला चोचीत पकडते. असे काही वेळा केल्यावर खाली येता येता पिल्लू स्वतःचे पंख पसरते व फडकावून बघते. आणि एकदम वर झेपावले जाते. त्या उंचीची भितीच मनातून काढून टाकली जाते, तेव्हा त्याचा गरूड होतो.


माणसात आणि पक्षांमध्ये फरक आहे हे नक्की. मात्र हा फरक अधोरेखित करताना त्यांच्यातलं काय चांगलं आपण घेऊ शकतो आणि माणूस म्हणून काय गोष्टी आपण वेगळ्या करू शकतो याचा विचार करण्याची वेळ आली आहे.


 माझ्या वडिलांच्या ऑफिसमध्ये एक जण होते. त्यांचे वडील मुलाचा सगळा पगार काढून घ्यायचचे आणि नंतर तो सगळा पगार खर्च करायचे आणि त्या व्यतिरिक्त ही अनेक ठिकाणी काय काय खरेदी करून भरपूर उधारी करून ठेवायचे. अतिशय उच्च पदस्त असलेले हे गृहस्थ,   वडिलांच्या या सवयीमुळे आणि नंतर दर चार दिवसांनी घरात पुढे उभे राहणाऱ्या घेणेकरांमुळे त्रस्त झालेले होते.


साध्या साध्या, अगदी  पिक्चर ला जाण्याच्या,  मनासारखा एखादा नवीन ड्रेस घेण्याच्या, एखादी छोटीशी घरातली किंवा स्वयंपाक घरातली उपयोगाची वस्तू घेण्याच्या,  ते अशा कित्येक छोट्या छोट्या इच्छा आकांक्षांना एका पिढीने मन मारून दाबून ठेवले. त्यांच्या आधीच्या पिढीने हा मुलांवरचा आपला हक्कच आहे असे म्हणून त्यांना क्षुल्लक क्षुल्लक आनंदाच्या गोष्टी देखील नाकारल्या.


न्यूटनच्या तिसऱ्या नियमासारखी कुठलीही टोकाची कृती ही दुसऱ्या कुठल्यातरी कृतीची (इक्वल आणि अपोजिट) समान इच्छाशक्ती ने आणि विरुद्ध टोकाची कृती झाल्यामुळे त्याची प्रतीक्षिप्त क्रिया होते. त्यामुळे आत्ताच्या पिढीने आपल्या मुलांना त्यांचे निर्णय स्वतः घेऊ देणे, त्यांचे कपडे स्वतः निवडण्याचे स्वातंत्र्य देणे, हे मुद्दाम होऊन, ठरवून शिकवले. मात्र हे करताना काही जणांनी ते डोळसपणे शिकवले. कुठले कपडे घातलेले समाजात योग्य दिसणार नाहीत, कुठल्या प्रसंगात योग्य दिसणार नाहीत, कुठल्या व्यक्तींच्या समोर योग्य दिसणार नाहीत, कुठल्या वयात योग्य दिसणार नाहीत, कुठल्या व्यक्तीला योग्य दिसणार नाही आणि कुठल्या देश राज्यात योग्य दिसणार नाही आणि कधी काय घालावे असा सारासार विचार करून कपडे निवडायला हवेत हे जेव्हा मुलांना शिकवले जाते, कळते तेव्हा त्यांची निवड बऱ्यापैकी योग्य दिशेने वळते. पाश्चात्त्य देशांप्रमाणे आता आपल्या कडे देखील सर्रास अर्धी चड्डी घालून मुली रस्त्याने हिंडताना दिसतात. रात्री अपरात्री येताना दिसतात. मात्र त्यांच्या आजूबाजूचा समाज तेवढा प्रगत नसेल, तर या मुलींना काही प्रसंगी अपप्रवृत्तींचा त्रासही ओढवावा लागतो. एखादा खेळ खेळताना त्या खेळाला अनुरूप पोशाख असणे हे अगदी योग्य आहे. उद्या सानिया मिर्झाने किंवा पी.व्ही. सिंधू ने साडी नेसून खेळावे अशी आपण अपेक्षा करणे चूक आहे. मात्र ती खेळाच्या मैदानावर जो ड्रेस घालते तो घालून ती लग्नाला किंवा बाजारात जात नाही. एवढेच कशाला खेळ संपल्यावर बक्षीस समारंभाच्या वेळी देखील बहुतांश स्त्री व पुरूष खेळाडू देखील आपापला अंगभर पूर्ण पोशाख घालून बक्षीस घेण्यासाठी उभे राहतात. हे भान ज्या दिवशी येते त्या दिवशी ते कुणालाच खटकत नाही.


पूर्वीच्या काळी समुद्र स्नानाला जाताना देखील बायका नऊवारी पाचवारी साडी घालून जात असत. अजूनही जातात. मात्र ती नीट घट्ट बांधली नसेल तर पाण्याच्या लाटे बरोबर ती साडी आवरता आवरता नाकी नऊ येई. क्वचित साडी सुटे देखील. मग अशा प्रसंगी पाण्यात घालता येतील असे सुटसुटीत आणि अंगावरून सुटून निघून येणार नाही असे कपडे घालणं हे योग्यच आहे. तिथे पण आपण जर सावरता येत नसलेल्या मुलींना पाचवारी साडी, नऊवारी साडी, डोक्यावर पदर असा आग्रह करू लागलो तर ती अतिशयोक्ती होईल.


मुलांच्या आवडीनिवडी आणि सवयी यात आई-वडिलांच्याही आवडीनिवडी, सवयी, व्यसन यांचा खूप मोठा हात असतो. आई-वडीलच येता जाता मोबाईल वर खेळत असतात, स्विगीवरून जेव्हा पदार्थ ऑर्डर करतात किंवा आपल्याला मोबाईल वरून जमत नाही तर मुलांना “अरे, तू करून देतोस का रे?” असे सांगतात, त्यावेळी आपल्याला हवे तेव्हा स्विगी वरून ऑर्डर करण्यात काही चूक नाही हे मुलांना समजून चुकते. मग त्यांनी जर येता जाता बाहेरून पदार्थ मागवले तर दोष कुणाचा?


मला आठवतं आमच्या लहानपणी काही काकू माम्या नोकरी करायच्या. पण काही वेळेला त्या खूप थकलेल्या असल्या तरी घरच्यांची अपेक्षा असायची की थोडक्यात न भागवता, दोन भाज्या, पोळी, कोशिंबीर, भात असा सगळा साग्रसंगीत स्वयंपाक त्यांनी घरी करावा. आमच्या आधीच्या पिढीतील आया इडली, डोसे, पावभाजी, पिझ्झा असे पदार्थ घरी बनवू लागल्या होत्याच की. मात्र त्या वेळचे त्यांचे नवरे मात्र त्यांना त्यांच्या आईने कधी असले पदार्थ खाऊन झोपण्याची सवय न लावल्याने बाहेर किंवा घरी दोसा खाल्ला तरी घरी आल्यानंतर “पोळी भाजी कर” म्हणून आग्रह धरायचे. त्यामुळे घरची बाई अगदी मेटाकुटीला येत असे.


आता त्याच आयांनी आपल्या मुलांना रात्रीच्या वेळी नुसतीच पावभाजी आहे बरं, किंवा नुसतीच मुगाच्या डाळीची खिचडी आणि कोशिंबीर आहे आणि हे जेवण असू शकते हे पटवून दिले. सवय लावली. आपल्याला जो त्रास झाला तो आपल्या मुलांना आणि त्यांच्या येणाऱ्या सुनांना होऊ नये, हा त्यातील हेतू. मग आता मुलांचा आहार चौरस राहत नाही, असे म्हणणे चूक आहे. कुठल्याही प्रांतातील पदार्थ खाल्ले तरी ते पोटभरीचे असावेत. त्यातून प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स , चोथा, साखर, मीठ, तेल, फळे आणि भाज्या यांचे योग्य प्रमाणात रोज सगळे नाही तरी आठवड्याभराच्या काळात, रुटीनमध्ये शरीरामध्ये अंतर्ग्रहण ( इंटेक्/intake) व्हायला हवा हे पाहिले तरी खूप झाले. हे मुलांना समजायला हवे.


खूप जणांच्या कडे लग्नकार्याला जाताना, नातेवाईकांकडे जाताना, मुलांना घरी सासू-सासऱ्यांकडे, किंवा त्यांच्या मित्रमंडळींकडे, किंवा मोबाईल वा टीव्ही लावून घरच्या घरीच ठेवून जाण्याची एका पिढीने सवय लावली. त्यात “आपल्याबरोबर लटांबर नको” आणि “मुलांचे आवरणे, त्यांच्या वेळा सांभाळणे नको” हाही सोयीस्कर हेतू असायचा. शिवाय मोठ्यांच्या काही गप्पा मुलांनी ऐकू नयेत, असे काही वेळेला त्यांच्या मनात येत असे. “लग्नकार्यात मुले काय करतील? कदाचित बोर होतील” असाही विचार असेल. काही वेळेला अगदी छोट्या मुलांच्या ही शाळेच्या अभ्यासाचे उगाच अवडंबर माजवून ही मुलांना लग्नकार्यात किंवा नातेवाईकांकडे नेणे, किंवा एखाद्या शुभ अशुभ प्रसंगात नेणे टाळले जाई. आमच्या लहानपणी शाळेत चिठ्ठी देऊन अशा प्रसंगी रजा घेणं आणि रजेच्या काळातील मुलांचा अभ्यास भरून घेण्याची हमी घेणे हे खूप सर्वसामान्य होते. मात्र आता काही शाळा मुलांनी सुट्टी घेण्याबद्दल फारच जाचक नियम देखील लावताना दिसतात. त्यांचे होमवर्क अवाढव्य असतात. आणि उगाच लग्नकार्य, शुभ अशुभ प्रसंगी मुलांनी शाळा बुडवूच नये, अशा आग्रहाच्या झालेल्या दिसतात. अगदी लहान वा मध्यम इयत्तांमधे शाळांमधील हा बदल खरंच स्वागतार्ह आहे का? हे एकदा तपासून पाहिले पाहिजे. कारण अशातून शाळा मुलांना त्यांच्या सामाजिक गरजांपासून वंचित करत आहेत. त्यांच्या आपसूक होणाऱ्या  सामाजिक शिक्षणापासून, समाजात मिसळण्याच्या, नैसर्गिकपणे होणाऱ्या योग्य-अयोग्य वागण्याच्या, वावरण्याच्या, कपडे घालण्याच्या, बोलण्याच्या, मोठ्यांचा मान राखण्याच्या, वेळप्रसंगी कुठले विधी करण्याच्या, किंवा  काय करुनये  याच्या, अशा सगळ्याच आपोआप होणाऱ्या शिक्षणापासून मुलांना वंचित ठेवत आहेत. त्यांना इतरांशी मिसळण्याची संधीच देत नाहीत. क्वचित प्रसंगी एखाद्या ठिकाणी तुम्हाला बोर देखील व्हायला हवं तरच त्या कंटाळ्याच्या क्षणी काय केलं तर आपण आपले मन योग्यरितीने चांगल्या पर्यायाने रिझवू शकतो हे मुलांना कळेल. नाहीतर पुढे मोठे झाल्यावर हीच सोशल स्किल्स पैसे देऊन मानसोपचार तज्ञांकडून शिकवावी लागतील.


 घरातील लहान मोठी खरेदी करताना जेव्हा आपण घरातल्या प्रत्येकाला दाखवतो, त्यांच्या आवडीनिवडी विचारात घेतो, घरात येणारी नवीन मोठी वस्तू जसे सोफा, फ्रिज, टीव्ही या गोष्टी रोज येत नाहीत. त्यामुळे त्या घेताना घरातल्या सर्वांच्या आवडीचा, चॉईस चा आणि बजेटचा या सर्वांचा विचार करून आपण घेऊया, हे त्यांच्या मनावर बिंबवले जाते. तेव्हा मुले देखील अशा वस्तू खरेदी करताना तुम्हाला दाखवतील. 


मात्र मुलांना कधी तरी काही वस्तू त्यांना त्यांच्या स्वतःच्या जबाबदारीवर घेऊ दिल्या, तर त्यांना “दुसऱ्या कोणाचा सल्ला न घेताच मी हे आता कसं घेऊ” असा आत्मविश्वासाचा अभाव जाणवणार नाही. याचीही जबाबदारी पालकांनी घ्यायला हवी, कारण उद्या हीच मुलं मोठी होऊन एखाद्या मोठ्या कंपनीतला परचेस ऑफिसर बनतील, कंपनीसाठी लाखोंच्या खरेद्या करतील किंवा एखाद्या जागा विकत घेतील, मोठ-मोठी कंपन्यांच्या उभारण्या करतील. अशा प्रत्येक वेळी जर ते कुणाच्या तरी सल्ल्यासाठी अडून बसले तर त्यांच्या आत्मविश्वासात कमी येईल. 


वीस पंचवीस वर्षांपूर्वी एक पिढीच्या पिढी परदेशात सर्रास जाऊ लागली. त्यांनी तिथे पाहिले की 60, 70, 80 वर्षाचे लोक सुद्धा आयुष्य जगणे सोडून देत नाहीत. योग्य आणि सकस आहार घेतात, आणि फक्त दुसऱ्यांसाठी जगण्यात आपलं मन मारत राहत नाहीत. स्वतःसाठी देखील जगायला हवं हे त्यांना त्यांच्या कडून कळले. स्वतःच्या आवडीसाठी कधी ट्रिप काढणं, एखादा हॉबी क्लास जॉईन करणं, आपलं स्वतःचं एक मित्र मंडळ तयार करणे हे त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये सामावून घेतलंय. कदाचित परदेशामध्ये / पाश्चात्त्य देशांमधे 16 व्या वर्षीच मुलाच्या नावाची डिश फोडली जाते, यातून “आज पासून तुझे तू कमवायचे आणि स्वतंत्र राहायचे, यात तुझे शिक्षण हे ही तुझे तूच करायचे आणि स्वतःच्या पायावर उभे राहायचे” हे मुलाला आणि मुलीलाही शिकवले जाते. मात्र हे करताना कधी कधी ही मुले घरट्याकडे परतत नाहीत आणि आई-वडील मात्र एक-एकटे किंवा दोघे-दोघे राहतात. अशावेळी नुसतेच झुरत बसून स्वतःच्या तब्येतीची आणि मनस्थितीची हेडसांड करणे, यापेक्षा त्यांनी स्वतःला कशामध्ये तरी गुंतवून घेणे गरजेचे आहे हे तिथल्या मनोवैज्ञानिकांनी जाणले. त्यांच्या सरकारांनी जाणले, आणि त्याप्रमाणे त्यांच्या समाज मनाला तयार केले. आज TV व  OTT मुळे तोच ट्रेंड भारतातही दिसत आहे. मुले मोठी होऊन शिक्षणानिमित्त, नोकरीनिमित्त घराबाहेर पडतात, आणि प्रत्येक घरात एक प्रौढ किंवा वृद्ध जोडपे किंवा कधी एक-एकटे राहिलेले पालक दिसतात. या सर्वांनी स्वतःच्या आवडीनिवडीसाठी सीनियर सिटीजन क्लब, लाफ्टर क्लासेस, योगा क्लासेस, क्लब, भिशी पार्ट्या असे स्वतःला गुंतवून ठेवायला सुरुवात केली आहे. यात वाईट काहीच नाही. कारण उडणाऱ्या पक्षाचे पाय बांधून ठेवणं ही दुष्टकृती आहे. मात्र ते करताना, त्यांना आकाशात उंच उडवताना, त्यांनी मागे राहिलेल्या त्यांच्या घरट्या तील वृद्ध पक्षांचनाही स्वतःचं एक निरोगी आयुष्य जगता यावं,  आणि त्यांचे आयुष्य असेपर्यंत त्यांचे उदरभरण त्यांचे त्यांना करता नाही आले तर आपण करायलाच हवं हे ही संस्कार कित्येक पक्षी ही देतात.  मग मुले करियर साठी परगावी गेली तर त्यात वाईट वाटून घेण्याचे काय कारण? IIT, IPS, UPSC, अशा अनेक स्पर्धा (काँपिटिटिव) परिक्षा देऊन बदली च्या नोकऱ्या करणारी, सैन्यात जाणारी, सरकारी /खाजगी नोकरी साठी बदली च्या ठिकाणी  राहणारी, परदेशात राहणारी  मुले आता महाराष्ट्रात ही जास्त प्रमाणात दिसू लागली आहेत.  


एक काळ असा होता की माणूस पोस्टात किंवा बँकेत चिकटला की रिटायर होऊनच बाहेर पडायचा. ब्रिटिशांनी त्यांच्या सोयीसाठी तयार केलेल्या या काही नोकरीच्या अपॉर्च्युनिटीज होत्या,  ज्या त्या काळच्या मध्यम वर्गाला पचनी पतय होत्या, परवडत होत्या. मात्र काळ बदलला आहे. आताच्या आमच्या पिढीत सॉफ्टवेअर मध्ये, आयटीमध्ये किंवा इतरही क्षेत्रात दर दोन-चार वर्षांनी लोक जॉब बदलतात. त्यांना नवीन अपॉर्च्युनिटीज मिळतात. हे आधीच्या पिढीला पचवणे थोडे जड जात होते. मात्र सध्या कंपन्यांची ही अशीच अपेक्षा असते की सगळ्याच लोकांनी दोन-चार वर्षानंतर कंपनीला चिकटूनच राहू नये. त्यांनी नवीन टेक्नॉलॉजी शिकावी आणि कंपनीच्या बाहेरही जाऊन नवीन जॉब शोधावेत. कारण जसजसे लोक जास्त अनुभवी होतील तसे त्यांचे पगार वाढतील, आणि इतक्या सगळ्या वरिष्ठ पदाच्या नोकऱ्या कुठल्याच कंपनीत असत नाहीत. कंपनीत त्याला पिरामिड स्ट्रक्चर म्हणतात. जिथे एंट्री लेवल ला म्हणजे सुरुवातीच्या एक दोन वर्षाच्या अनुभवाच्या नोकऱ्या ह्या खूप जास्त प्रमाणात असतात, तर सगळ्यात वरिष्ठ माणूस हा एकच असतो, आणि त्याच्या खाली त्याला रिपोर्ट  करणारे आठ ते दहा लोक हे सीनियर मॅनेजर्स आणि त्यांच्या हाताखाली प्रत्येकी दहा ते पंधरा लोक असे हे पिरामिड असते. मात्र जर  लोक कंपनी सोडूनच गेले नाहीत तर एवढ्या सगळ्या लोकांना काम काय द्यायचे हा कंपनीला प्रश्न पडेल. आणि लोक तरी आहे त्याच पगारावर वर्षानुवर्ष, वीस वीस वर्ष तेच काम करत राहतील का? त्यांनाही प्रमोशनची अपेक्षा असेलच. त्यामुळे हा सगळा विचार करून बदलत्या काळानुसार प्रत्येकानी आपापल्या ज्ञानाच्या कक्षा रुंद करायला हव्यात आणि एका काळानंतर दुसरी कडे नोकरीच नाही तर स्वतःचीही नवीन कंपनी सुरू करण्याचा विचार करायला हवा, तरच हा देश नवनवीन उद्योगांनी, उत्साहाने भरलेल्या तरुणाईने आणि नवीन टेक्नॉलॉजीने विकसित होईल. यातील कित्येक नवीन टेक्नॉलॉजी या आमच्या पिढीनेही ऐकल्या नव्हत्या, तर आमच्या आधीच्या पिढीने तर ऐकल्या असण्याची शक्यता खूपच कमी आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, नॅनो टेक्नॉलॉजी, रोबोटिक्स, बायो इलेक्ट्रॉनिक्स अशा कित्येक नवनवीन शाखा उदयास येत आहेत. आमच्या आधीच्या पिढीने जे जॉब केले ते कदाचित याच्यापुढे अस्तित्वातही नसतील. पण याचा अर्थ जॉबच नसतील असे नाही, तर नोकऱ्यांचे स्वरूप, कामाचे स्वरूप आणि ज्ञानाचे स्वरूप बदललेले असेल. कंपन्यांनाही नवीन टेक्नॉलॉजी मध्ये शिक्षण झालेले लोक हवेच आहेत. त्यामुळे जर आताच्या मुलांनी आता पालकांना “मी अमुक एका कंपनीमध्ये नोकरी करू का?” असे विचारले तरी त्यावर आपल्या आधीच्या पिढ्यातले किती लोक त्यांना योग्य मार्गदर्शन करू शकतील? त्यामुळे हा निर्णय हा मुलांनी त्यांचा त्यांनीच घ्यायला हवा. त्यात काही चूक नाही हे आई-वडिलांनी देखील समजून घ्यायला हवे. मात्र “आपण नोकरी बदलली आहे, किंवा बदलणार आहे” हे आई-वडिलांशी चर्चा करून त्यांना सांगण्या इतका संवाद सगळ्याच पिढीने राखायला हवा.


 कंपन्यांमध्ये आजकाल “अजाईल मेथोडोलॉजी” असा एक नवीन कामाचा प्रकार आहे. यामध्ये प्रॉडक्ट किंवा वस्तू निर्माण करण्याचा कालावधी हा कमी केला जातो, आणि दर छोट्या छोट्या कालावधीत काहीतरी एक प्रॉडक्ट बाहेर पडत असते. (कधी कधी तर अगदी एक दिवसात, एक आठवड्यात किंवा एक महिन्यात प्राॕडक्ट तयार होते ज्याला पूर्वी सहा सहा महिने लागायचे.) त्यामुळे झटपट निर्णय घेणे, काही चुका झाल्या तरी त्या झटपट सुधारणा करता येणे शक्य होते. आणि हे करण्यासाठी “ अजाईल मेथोडोलॉजी” मध्ये एक “डेली स्टँड अप मीटिंग” असते ( रोजची छोटी बैठक/ किंवा  खरंतर न बसता केल्याने, बैठक न म्हणता उभ्या उभ्या होणारी दहा पंधरा मिनिटांची छोटी सभा म्हणूया) असते ज्यात प्रत्येक जण काल आपण दिवसभर काय केले? त्यात कुठे अडले? काय नवीन केले? आणि आज आपण काय करणार आहोत? याचा आढावा देतो.


अशीच एक स्टँड अप मीटिंग जर प्रत्येक घराने रोज घेतली किंवा निदान आठवड्यातून एकदा घेतली तर घरातल्या प्रत्येकालाच घरातला प्रत्येक माणूस काय करतोय, त्यांच्या आयुष्यात काय चालले आहे, त्यांच्या आयुष्यातल्या कुठल्या वळणावर त्यांना आपल्या सल्ल्याची गरज आहे का? पैशाची गरज आहे का? भावनिक आधाराची गरज आहे का? याचा एक थोडासा अंदाज येऊ शकेल. पक्षी सुद्धा जेव्हा घरट्यातून उडून जातात त्यानंतर त्यांच्यातील वृद्ध पक्षांची ही त्यांच्या तोंडात खाणे भरून घेऊन जाऊन काळजी घेताना दिसतात.


आता नोकरीसाठी घराबाहेर पडलेल्या मुलांनी किती काळ स्वतंत्र रहावे? आयुष्यभर स्वतंत्रच राहावे की काही काळानंतर परत एकदा आपल्या आईवडिलांबरोबर एकत्र कुटुंबात राहायला यावे हा सर्व त्या त्या कुटुंबाचा

कौटुंबिक विषय आहे.


असेच आपली मुले ही सुरुवातीला नोकरीनिमित्त, शिक्षणानिमित्त बाहेर जातील स्वतंत्र राहतील पण त्यानंतर आई-वडील वृद्ध झाल्यावर मात्र त्यांनी सर्वांनी पुन्हा एकदा एकत्र रहावे. किंवा रहावे का? राहिल्यास त्यांचे आपापसात पटेल का? मधल्या काळात ते सर्व किती काळ अधून मधून तरी एकत्र राहिले आहेत? एकमेकांच्या आवडीनिवडी समजून घेतल्या आहेत? खाण्यापिण्याच्या, राहण्याच्या, वागण्याच्या, बोलण्याच्या बदलेल्या सवयी समजून घेतल्या आहेत? आणि त्यांना एकमेकांचे राहणीमान किंवा वागणे हे पूर्णपणे अपरिचित तर झाले नाही ना? हे सगळे त्या त्या कुटुंबाच्या आपापसातील समीकरणावर अवलंबून आहे. 


आता करोना व लॉकडाऊन नंतर, वाईट टू के (Y2K) नंतर, इराण इराकच्या युद्धानंतर, रशिया युक्रेंनच्या युद्धानंतर, इसराईलच्या युद्धानंतर, सुनामीनंतर, अशा अनेक नैसर्गिक वा मानवनिर्मित संकटांनंतर परदेशी गेलेली कुटुंबे किंवा मुले परत येताना दिसतात. परत एकदा भारतात आल्यानंतर यातील अनेक कुटुंबे एकत्र देखील राहतात. सध्याच्या काळात खूप मोठ्या प्रमाणात मोठमोठया हाऊसिंग सोसायटी तयार होत आहेत. परदेशात जेवढ्या सोयी आहेत तशाच, किंबहुना कधी कधी जास्त सोयी देखील भारतीय सोसायट्यांमध्ये दिसू लागल्या आहेत. जिम, वॉकिंग ट्रॅक, स्विमिंग पूल, योगा रूम्स, मेडिटेशन रूम, गार्डन हे सर्व सोसायटीमधील अमेनिटी म्हणून दिले जाऊ लागले आहे. अशावेळी अनेक कुटुंबे एकाच सोसायटीमध्ये दोन-दोन तीन-तीन फ्लॅट घेताना दिसतात. आई वडील आणि मुलगा किंवा मुलगी समोरासमोरच्या फ्लॅटमध्ये किंवा एकाच सोसायटीतील फ्लॕट मध्ये राहतात. ते रोजच्या रोज भेटतातही आणि तरीही कित्येकदा रोजच्या रोज आपापले स्वतंत्र आयुष्य, प्रायव्हसी जगतात. एकमेकांच्या पायात पाय न घालता एकमेकांबरोबरचे सणावाराचे, संध्याकाळचे, वीक एंड चे असे कौटुंबिक व सार्वजनिक आयुष्य ही एकत्र जगतात. ही नवीन एकत्र कुटुंब पद्धती आहे. याचा सुद्धा बऱ्याच कुटुंबांनी स्वीकार केला आहे. जुन्या आठवणी, नॉनस्टॉल्जिया हा क्वचित कधीतरी चांगलाच असतो. पण जर जुनी पिढी दररोज किंवा दर थोड्या दिवसांनी “आमच्या वेळी हे असं होतं” आणि “आमच्या वेळी हे तसं होतं” असे म्हणत राहिली तर तरुण पिढी आणि अति तरुण नातवंडे हळूहळू तुम्हाला टाळू लागतील. आपले ज्ञान, आठवणी, शिकलेले शहाणपण किती मर्यादेपर्यंत पुढच्या पिढीला सांगायचे किंवा नाही सांगायचे हे ज्याचे त्याने ठरवायला हवे. तुम्ही दोन पावलं पुढे या आणि आम्ही दोन पावले पुढे टाकतो असे म्हटले तरच ही मोट बांधली जाणार आहे. आणि जनरेशन गॅप हा काही ह्याच पिढीचा शाप नाही. अगदी रामायण महाभारत काळापासून जनरेशन गॅप होतीच. रामायणाच्या काळात आई-वडिलांचे अतीच ऐकल्यामुळे रामाला 14 वर्षे वनवास भोगाव लागला तर महाभारताच्या काळात आई-वडिलांचं मुळीच न ऐकल्यामुळे आणि नितीनियम झुगारल्यामुळे कुळाचा नाश झाला. याचा सुवर्ण मध्य आपणच साधायचाय. आपल्यासमोर दोन्ही टोकाची उदाहरणे आहेत. अगदी अलीकडचे पुलंच्या “असा मी असामी “ मधील “असामी” ने देखील नवीन आणि जुन्या पिढीतील जनरेशन गॅप अधोरेखित केलीच आहे. ही जनरेशन गॅप आपण एन्जॉय करत आत्मसात केली तर आपणही सुखी होऊ आणि आपली मुले देखील सुखी होतील असे वाटते.


- सुवर्णा

16-मार्च-2024

Tuesday, March 12, 2024

नावात काय आहे?


मुंबई च्या 7 स्टेशन ची नावे बदलली. त्यावर एका मित्राची  काॕमेंट आली, "अरे अजून इतक्या वर्षांनंतरही मी CST ला VT च म्हणतो".


त्यावर लक्षात आले, CST चे तर जाऊच दे, अजूनही कित्येक लोक बाँम्बे, बँड्रा, वगैरे म्हणतात त्याला काय म्हणावे! ब्रिटिशांचा व हिंदी भाषिकांचा (नको इतका फाजील ) प्रभाव.


पण म्हणावेसे वाटले, की तुमची पुढची पिढी मात्र नवीन नावच उच्चारेल कारण त्यांनी तेच ऐकले आहे.


मी मुंबईत आल्यावर सांताक्रूज जवळ एका क्लास ला जात होते. ते नाव चांगलेच तोंडात ही बसले. नंतर जाॕब लागल्यावर कोणीतरी म्हटले, " मी सँटाक्रोज ला राहतो." ऐकताना एकदम विचित्र वाटले. कदाचित इंग्रजी शब्दाचा तो उच्चार योग्य असेल ही, पण स्टेशनचे नाव मात्र "सांताक्रूज" च पटत होते कारण तेच रोज वाचले होते.


"संभाजीनगर"ला अट्टाहासाने "औरंगाबाद" म्हणणारे, "प्रयागराज"ला अट्टाहासाने "अलाहाबाद" म्हणणारे लोक आहेतच.


"नगर" चे एक बरे आहे. त्याला खूप वर्षांपासून "अहमदनगर" असेही फारसे कुणी म्हणत नव्हते तर  आता "अहिल्यानगर" हे नाव ही कोणाच्या लक्षात राहिले नसेलच. त्याचे नाव आपले नुसते "नगर" च. काही शहरांची नावे मात्र सदा सर्वकाळापासून असलेली नसलेली सर्व नावे समजूतदार लोक समजून घेतात. तुम्ही "बडोदा/वदोडा/ वडोदा/ वडोदरा/बडोदरा" काही महटले तरी लोकांना कळते. तसे, "बनारस/वनारस/वाराणसी/वाराणशी/ काशी"   काही ही म्हटले तरी कालमानाच्या पलिकडे जाऊन लोक बापडे समजून घेतात. 


पण आपल्या नावाबद्दल जसा आपल्याला अभिमान असतो तसा गावांच्या नावाबद्दल ही असतोच की. पुण्याचे काॕस्मोपाॕलिटियन रूप झाल्या पासून तर गावांच्या नावाच्या नुसत्या चिछड्या उडाल्या आहेत. ते ऐकताना अगदी कानावर तप्त रस पडल्यासारखे वाटते.


"हिंजव डी" ला "हिंजे वाडी", "बाणेर" चा बाणेदार पणा जाऊन मुळमुळीत "बानेर", "येरव डा" चे "येर वाडा", औंध ( अऊँध असा उच्चार मराठीत आहे) पण त्याचे हिंदी भाषिकांनी केलेले "आॕन्ध", "सातारा" चे "सतारा", मुबलक विहीरींचे / बाव असलेले "बाव धन" चे  एकदम सावधान म्हटल्या सारखे "बावधान", एक ना दोन. शब्द उच्चारताना कुठे तोडावा ह्याचे एक स्थानिक गणित असते. आता "हडप सर" ला उच्चारताना "हड पसर" म्हटले तर चालेल का?


 पण नवीन नावे तोंडात बसायला अंमळ वेळ लागतोच. जर लग्न ठरण्याच्या आधीपासून होणारी सून घरी येतजात असेल, परिचयाची असेल तर, लग्न झाल्यावर तुम्ही कितीही नाव बिव बदला, बहुतांशी लोक जुन्याच नावाने हाक मारतात. आणि माहेरचे आणि सासरचे लोक तर हमखास आपापले ठेवलेले नाव घट्ट धरून बसतात.


कधीकधी असे खास कारण नसते पण जुने नाव तोंडात बसलेले असते म्हणून आपण म्हणत राहतो. आपण ही कलकत्ता म्हणतोच की. अजून कोलकाता किंवा बंगळुरु वगैरे तोंडात बसत नाही. 


मात्र "मद्रास" म्हणणे सुटले आहे. Thanks to "Chennai express" आणि Chennai super kings😀


शेक्सपियर म्हणतो नावात काय आहे? तर महाराजा, नावातच सर्व काही आहे.


त्या त्या नावाबद्दल आत्मीयता वाटल्या शिवाय माणसे आपणहून नाव उच्चारत नाहीत. नाहीतर चांगल्या रमेश, सुरेश, शुभांगी चे बंट्या, बाळ्या, पिंटी होते.


आमचे एकजण ओळखीचे होते. ते नावावरून भविष्य सांगायचे. ते नेहमी म्हणत, "नाव बदला म्हणजे माणसाचा, शहराचा, देशाचाही, स्वभाव, चेहरामोहरा बदलेल".


प्रत्येक जेत्याला शहरांची नावे बदलावीशी वाटतात कारण त्यानंतर त्याची जुनी ओळख पुसली जाणार असते. हे राजरोस पणे होते. ( हेर बीर लोकांसारखे लपून छपून नाव बदलावे लागत नाही.) त्यामुळे नव्या राज्यकर्त्यांचा जनमानसावर ठसा उमटवणे, नव्या सत्ते विषयी अभिमान व निष्ठा जागृत करणे सोपे जाते. एक नवा इतिहास त्या त्या शहराला, देशाला नवीन नावाने इतिहासाच्या पुस्तकात स्थान देणार असतो. कधी पारतंत्र्यांच्या खुणा पुसून टाकायच्या असतात व नवीन टीम, नवा अभिमान वाढवायचा असतो.


 इतकेच कशाला अगदी एखाद्या कंपनीत ली छोटी शी डिविजन/ युनीट एका मॕनेजर कडून दुसऱ्या मॕनेजर कडे गेले की खूपदा त्या डिव्हीजन चे नाव बदलले जाते. त्या युनीटचे भविष्य बदलण्याचा एक छोटासा प्रयोग च म्हणा ना.


तर असे हे नाव पुराण व नावांची महती.


-सुवर्णा

13-3-2024

हिंजवडी, कॅब आणि प्रवासी

  हिंजवडी, कॅब आणि प्रवासी हिंजवडी च्या  IT कामगारांना रिक्षा आणि टॅक्सी वाल्यांनी अव्वा च्या सव्वा पैसे लावून अनेक वर्षे लुटले. 1 km यायलां...