खाण्यासाठी जगावे की जगण्यासाठी खावे?
कोंबडी आधी की अंडे आधी तसा हा प्रश्न युगानुयुगे चालत आलेला आहे. मात्र कलियुगा इतके खाण्याचे विविध options इतर युगात असण्याची शक्यता थोडी कमी आहे.
कोणी काही म्हणो खाण्यासाठी जगावे हेच खरे.
जगण्यासाठी खाणारी माणसे फार च गंभीर, खूपच विचार करत राहणारी व प्रत्येक गोष्टीतील enjoyment चा भाग पूर्णपणे त्यागून अलिप्त झालेले असतात.
ते रसरसून आयुष्य उपभोगत नाहीत तर आलिया भोगासी असावे सादर म्हणून प्रत्येक गोष्ट गंभीर पणे घेऊन त्याचा कीस पाडतात. जे लोक फक्त जगण्यासाठी खातात त्यांचे आयुष्य कदाचित 25-30 वर्षे जास्त असेलही. पण त्यातील ते जगले किती? असा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर खूपच कमी लोकांकडे खरच तेव्हढी 25 वर्षे जास्त असेल.
जगण्यासाठी खाणारी माणसे, पाऊस पडला म्हणून भिजायला जाणार नाहीत, की पाऊस बघत भजीचे रसभरीत चोचले पुरवणार नाहीत. चार नवीन पदार्थांचा सोस नाही की नवनवीन ठिकाण चे अनुभव, चव, मित्र गोळा करण्याची हौस असणार नाही.
खेड्यात बायकांनी कुंकवाला आणि पुरुषांनी चहाला नाही म्हणू नये अशी म्हण दिसते. त्या हवेत व मेहनतीत ते पचत ही असेल. पण आलेल्या पाहुण्याचा पाहुणचार हा खाण्यापिण्यानेच होतो हे खरंय व अधोरेखित होते. चाय पे चर्चा आणि talks and bonding with coffee हे निखालस सत्य आहे.
रिकाम्यापोटी गप्पा देखील फार होत नाहीत. त्यामुळे जगण्यासाठी खाणार्या माणसांना मित्र ही मोजकेच असतात. ( अपवाद असतील ही). खळखळून हसणे आणि ढसढसा रडणे आणि मोकळे होणे अशा शुल्लक गोष्टीतही ते प्रथम सुखदुःखे समेकृत्वा असा विचार करतात, जो काहीच लोकांना झेपतो. बाकींचे अंगावर भावनांचे, विचारांचे ओझे घेत जगतात.
शारिरीक दृष्ट्या भरपूर आयुष्य असले तरी मानसिक दृष्ट्या तो परित्याग नसेल तर अशी माणसे एकेकटी जास्त आढळतात. कारण बोलण्याचे त्यांचे सामान्य विषय च कटाप होतात.
ज्याला चवीचे चोचले तो आपसुक त्यासाठी मेहनत पण करतोच. त्यामुळे चवीने खाणार त्याला देव देणार अशी वृत्ती अंगिकारावी हेच बरे.
नाहीतर उद्या वर गेलो आणि चित्रगुप्ताने विचारले की रंकाळ्यावर भेळ खाल्लीस का? वैशाली रुपाली चे डोसे खाल्लेस का? अठरापगड चहा ची चव पाहिलीस का? अप्पाची खिचडी, झणझणीत मिसळ, गरमागरम चीझच्या सुटणार्या शेवयांसारख्या तारे चा पिझ्झा, सणाला केलेल्या साजुक तुपाची धार सोडून वाढलेल्या मऊसूत पुरणपोळ्या, प्रवासात खाल्लेले बटाटेवडे, गुजरात चा खमण, राजस्थान ची दालबाटी, दक्षिण भारतातील समस्त उडदाची डाळ व तांदळाचे विविध पदार्थ, खोकल्याच्या नावाखाली मटकावलेला आलेपाक, काँटिनेंटल, चायनीज, एशियन, एक ना दोन... तर सांगायचा मुद्दा, हे सगळं खाल्लंस की नाही?
आणि "नाही" म्हटलं तर चित्रगुप्त महाराजांनी दिलं ढकलून परत आणि " जा जरा आयुष्य जगून ये" म्हटले तर काय घ्या.
त्यापेक्षा आत्ताच काय ते खाऊन घ्या. "इंद्रस्य (शक्रस्य) तक्रं दुर्लभः" असे म्हणतात. अहो! जिथे साक्षात स्वर्गाच्या राजाला देखील स्वर्गात ताक सुद्धा मिळत नाही असे म्हणतात तर बटाटेवडा कुठून मिळणार? त्यामुळे इथे आहोत तोपर्यत खाऊन घ्यावे हे बरे. कसे??? हा हा हा हा.
- सुवर्णा उपलप
23 Aug 2022