अख्ख्या जगभरातील एक खूप मोठा एकांगी उपक्रम.
UN मधील महिला ठरवतात की तुमचा ह्या वर्षी चा महिला दिनाचा विषय काय असेल. सगळ्या जगभरातील कंपन्या, महिलांच्या संस्था त्यांचा अजेंडा राबवतात.
काय आहे ह्या वर्षीचा अजेंडा? तर आपपरभाव कमी करा. दोन माणसांमधली दरी कमी करा. प्रत्येक माणसातील वेगळेपणा समजून घ्या. त्यातूनही ती स्त्री असेल तर तिला अधिकच दुजाभाव मिळतो. तो कमी करा. किती उदात्त हेतू!!
पण मग प्रत्येक कंपनीचे महिला दिनाचे पोस्टर पाहिले तर काय लक्षात येते? 5 ते 7 महिला, ज्यात मध्यभागी एक हिजाब धारी महिला असेल. मग आजूबाजूला इतर 4-6 चित्रे. एक अफ्रिकन/ कृष्णवर्णीय महिला, एखादी शाॕर्ट घातलेली महिला, bias हा शब्द आला की Times group ला प्रकर्षाने दिसणारा LGBT गट आणि त्यांचे सदस्य, मग एक- दोन जागा उरल्या असतील तर लाल किंवा काळे केस असलेल्या शर्ट पँट किंवा टी शर्ट जीन्स घातलेल्या एक- दोन महिला. हाच एक साचा दिलेला आहे, आणि सर्व IT कंपन्यांनी तो उचललेला आहे.
मुळात आत्ता आत्ता पर्यंत IT कंपन्यांमधे बिझिनेस फाॕर्मल घालणे देखील बंधनकारक होते. कस्टमर (ग्राहक म्हणणे ह्या IT विषयात बसत नाही म्हणून मुद्दाम कस्टमर) च्या ठिकाणी तुमची नेमणूक असेल तर फाॕर्मल अगदीच बंधनकारक असत. फाॕर्मल कशाला म्हणायचे? तर जे कपडे तुम्ही औपचारिक प्रसंगी घालता, जसे लग्न समारंभात, किंवा एखादे नाश्ता (breakfast) दुपारचे भोज आयोजित केले असेल किंवा सरकारी कामकाजाला जाताना घालायचे कपडे. म्हणजे मुख्यत्वे काळा व पांढरा रंग असलेला पोशाख, कारण इंग्रज लोक हे प्रत्येक प्रसंगाला वेगळा पोशाख घालत. सकाळच्या नाश्त्याला, दुपारच्या जेवणासाठी, लग्नसमारंभासाठी व संध्याकाळचे जेवण्यासाठी. आणि त्यांचे जिथे जिथे राज्य होते तिथे प्रत्येक ठिकाणी हा पोशाख फॉर्मल म्हणून प्रसिद्ध झाला, राबवला गेला.
आता इंग्रजांच्या बरोबर व्यवहार करायचा, बिझनेस-व्यापार करायचा तर आपण फाॕर्मल दिसले पाहिजे. त्यामुळे आपोआपच समोरचा माणूस जास्त स्वाभाविक (कम्फर्टेबल) होतो आणि आपला पुढील संवाद हा सुखकर होतो. कंपन्यांमध्ये ड्रेस कोड लावण्यामागे ही एक मोठी कारणमीमांसा होती. IT कंपन्यांच्या सुरूवातीच्या काळात, IT उद्योगाच्या उदयात dress code चा मोठा वाटा आहे.
मग पुढे कधीतरी लक्षात आलं की हे "बायस" आहे, ( लादलेला, दुजाभाव, व्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला आहे.) आणि अमेरिकेत वगैरे लोकांनी ड्रेस कोड विरुद्ध आवाज उठवला. जीन्स आणि टी शर्ट का नाही घालायचा? तो अंगभर सभ्य पोशाख नाही का? मग हळूहळू फ्रायडे कॅज्युअल झाले.( म्हणजे आठवड्यातून एकदा जीन्स घालू शकता, इतके, की जीन्स हाच शुक्रवारचा बंधनकारक पोशाख झाला. नंतर तर अमेरिकेतील बऱ्याचशा कंपन्यांनी फॉर्मल घालण्याची बंदीच काढून टाकली. हळूहळू हे लोण भारतातही आले आणि भारतातही फॉर्मल चे नियम शिथिल झाले.
बायकांनी सुरुवातीला आवाज उठवल्यावर भारतातल्या ऑफिसमध्ये तरी तुम्ही सलवार-कमीज किंवा साडी नेसून येऊ शकता असे ठरवले गेले. त्यातही हे सलवार-कमीज किंवा साडी फार रंगीबिरंगी नसावी, मोठ्या फुलांची नसावी असे नियम सांगितले गेले. गेल्या दोन वर्षांमध्ये लाॕक डाऊन मुळे फॉर्मलच काय, लोकं घरच्या पजामा मध्ये आणि गाऊन मध्ये काम करत होते. तरीदेखील आयटी कंपन्यांना आणि ऑनलाईन काम करणाऱ्या लोकांच्या बिजनेस मध्ये कुठलाही फरक पडला नाही. त्यामुळे व्यापारासाठी अमुक एक पोशाख हा नियम पूर्ण फोल ठरला.
आता बघू या की अचानक हा बायस (bias) कुठून आला? भारतामध्ये अचानकच हिजाब घालायची मोहीम सुरू होते. त्याच्याविरुद्ध आंदोलनं होतात आणि असं लक्षात आणून दिले जाते की जे कोणी हिजाब घालतात त्यांच्याविरुद्ध लोकांचे मत चांगले नाही. त्यांना दुजाभावाने वागवले जाते. मग भारतभर एक अजेंडा राबवला जातो. भारतभर म्हणण्याचं कारण असे की त्याच वेळी जगभरातल्या मुस्लिम महिला मात्र टीव्हीवर किंवा इतर समारंभात, प्रवासात कुठे ही हिजाब घालताना दिसत नाहीत. अगदी युक्रेन मधून परत आलेल्या मुस्लिम मुली देखील हिजाब चा अट्टाहास करताना दिसत नाहीत. मग हे भारतातच का? कारण त्याचा अजेंडाच वेगळा आहे.
भारतामधल्या आयटी कंपन्यांमध्ये क्रिसमस च्या सुमाराला बऱ्याच ठिकाणी आठवडाभर सुट्टी दिली जाते. याचे कारण जगभरातल्या कंपन्यांना त्या काळात सुट्टी असते. कारण ते ख्रिश्चन आहेत. ख्रिसमस साजरा करतात, आणि ख्रिसमस साजरा करण्यासाठी सुट्टी घेऊन प्रवासाला वगैरे जातात. स्वतः चे सण साजरे करणे हे त्यांचे किती कौतुकास्पद आणि उदात्त विचार आहेत!! त्यांना सुट्टी हवीच.
मग हा क्रिसमस सगळ्या कंपन्यांनी आपापल्या भारतातील शाखेमध्ये देखील जोरदार साजरा करायला हवा म्हणून आयटी मधील HR ( ह्यूमन रिसोर्सेस डिपार्टमेंट) त्यासाठी कार्यरत असतात. त्या निमित्त वेगवेगळ्या स्पर्धा भरवल्या जातात. डेकोरेशन केले जाते. क्युबिकल डेकोरेशन केले जाते. बिल्डिंग सजवली जाते. कॅन्टीन मधले पदार्थ आणि सजावट लाल - हिरवी दिसायला लागते.
मात्र हे करताना गेल्या कित्येक वर्षात हळूहळू याच कंपन्यांमधील दिवाळीच्या सुट्ट्या मात्र कमी कमी होत चालल्या आहेत. पूर्वी तीन दिवस सुट्टी असे. कारण दिवाळी चार-पाच दिवसाची तरी असतेच. मग हळू हळू 3 चे 2 झाले. मग गेली दोन वर्षे एकच दिवस सुट्टी मिळत आहे. अजून काही वर्षांनी ती सुट्टी देखील ऑप्शनल ( पर्यायी ) म्हणून दिली जाईल.
आयटी कंपन्यांमध्ये मुस्लिम बांधवांसाठी दिवसातून दोन तीन वेळेला अनेक कंपन्यांमध्ये नमाज पढण्याची वेळ, सोय असते. कारण त्यांच्या धर्मात तसे सांगितले आहे. मग हे लोक अर्धा तास ते एक तास गायब होतात. त्यात काही काळ कामाचा खोळंबा होतो. पुढे कारण असे दिले जाते की ते लोक नंतर ते काम पूर्ण करतात. त्यामुळे त्यांना ती सुट्टी देणे योग्य आहे. शुक्रवार असेल तर दोन दोन तास हे कर्मचारी नमाजच्या निमित्ताने बाहेर जातात. मात्र अशा सुट्ट्या इतर धर्मियांना मिळत नाहीत. हिंदूंना तर नाहीच नाही.
किती आयटी कंपन्यांमध्ये गणपती बसतो? किती आयटी कंपन्यांमध्ये गणपतीच्या वेळेला, गणपती उत्सवा शी संबंधित काही स्पर्धा सजावट केली जाते? खूप कमी. अगदीच मराठमोळी कंपनी असेल तर थोडेफार सण साजरे केले जातात. नाहीतर मूर्ती पूजा वगैरे ऑफिसमध्ये करणं हे ऑफिस च्या सभ्यतेत बसत नाही. पण मग नमाज पढणे किंवा क्रिसमस चे डेकोरेशन करणे, किंवा सिक्रेट सान्ता साजरा करणे, हे मात्र खूप पुढारले पणाचे लक्षण आहे असे ठासवले जाते. त्यामध्ये ऑफिसची सभ्यता आड येत नाही.
आता जर असा विचार केला तर या सगळ्या बायस मध्ये हिंदू मनुष्य आणि त्यातल्या त्यात हिंदू स्त्री यांना कुठेही मनुष्य म्हणूनच स्थान नाही, तर त्यांच्या विचारांना, सणांना, पोषाखांना कुठले स्थान मिळणार? कुठल्याही " ब्रेक द बायस" च्या चित्रामध्ये साडी, सलवार-कमीज, ठळक कुंकू लावलेली बाई नाही. तिने कुंकू लावले काय, नाही लावले काय, ती काम कसं करते याला जास्त महत्त्व आहे. त्यामुळे ते वेगळे कशाला दाखवायचे? तरीही तिच्या साडीला, तिच्या कुंकवाला कुठेही बायस मधे जागा नाही.(पण हा न्याय हिजाबला मात्र नाही.)
फॉर्मल ची व्याख्या जर बघितली तर आपले लग्न समारंभ, भोजन समारंभ किंवा मग कुणाकडे जाण्यायेण्याच्या प्रसंगी, औपचारिकरीत्या घालायचे कपडे. हे खरंतर भारतात रंगीत च असतात. काळे पांढरे कपडे हे आपण मुख्यतः शोकाच्या प्रसंगी घालतो. मग काळे पांढरे कपडे न घालणं किंवा रंगीत कपडे घालणं हे बिझनेसच्या विरुद्ध का बरं असेल? भारतातच इतकी विविधता आहे. एखादी घागरा घातलेली स्त्री एखाद्या IT कंपनीच्या बिझनेस मिटिंगला मोकळे पणाने बसु शकेल? किमान दक्षिण भारतीय वस्त्र नेसलेल्या बायका?
धोतर घातलेला पुरुष किंवा साडी नेसलेली बाई हे बिझनेस करू शकत नाहीत. का ? गेल्या दोन अडीच हजार वर्षांपूर्वी पर्यंत जेव्हा भारत एक महासत्ता होता तेव्हापासून ते अगदी ब्रिटिशांचे राज्य येईपर्यंत भारतात जे काही व्यापारउदीम झाले ते काय शर्ट पॅन्ट घालून झाले? मग हा फाॕर्मल चा अट्टाहास कशासाठी? प्रश्न फॉर्मल्स चा नाही. ज्याला जे आवडेल ते त्यांनी घालावे.
हा प्रश्न अचानक आला कारण या प्रत्येक चित्रांमध्ये मध्यभागी हिजाब घातलेली स्त्री आहे, पण हिंदू स्त्री मात्र हद्दपार केलेली आहे.
हिजाब घालून आत्तापर्यंत भारतातही स्त्रिया फारशा दिसत नसत. अचानक तो भारतीय लोकांचा पेहराव कसा झाला? अचानकच सगळ्या आयटी कंपन्यांमधील मुस्लिम लोकांनी दाढ्या वाढवणे, टोप्या घालून येणे, कसे सुरू झाले? काही लोक तर पांढरे डगले घालून येऊ लागले. हे कसे सुरु झाले? का झाले?
मग हे सगळं करताना मुळातला जो भारतीय मनुष्य आहे, हिंदुस्थानातील माणूस आहे, त्याचा पेहराव कुठे गेला? हिंदू स्त्री चा पेहराव, तिचं अस्तित्व, तिचे सलवारकुरते, साडी, सण वार कुठे गेले? याच्यावर कुठलेच आंतरराष्ट्रीय इव्हेंट/ इनिशिएटिव्ह भाष्य करताना दिसत नाहीत.
त्यामुळे मुळात ब्रेक द बायस हाच पूर्णपणे बायस्ड (biased) कार्यक्रम आहे. त्यामुळे त्याच्यावर मुळापासूनच बहिष्कार टाकायला हवा. प्रत्येक भारतीयाने, प्रत्येक भारतीय स्त्री ने, आत्मपरीक्षण करून आपण खरंच ह्या ब्रेक दा बायसचा भाग आहोत का? याचा विचार करावा. एक भारतीय स्त्री म्हणून माझा आंतरराष्ट्रीय स्त्री दिनाच्या या बायस्ड "ब्रेक द बायस" उपक्रमाला पूर्णपणे विरोध आहे.
-सुवर्णा
4 - Mar- 2022
Perfect observation...
ReplyDeleteअगदी बरोबर... आपण पूर्णपणे विरोध केला पाहिजे
Deleteअगदी बरोबर.... आपण आपलं अस्तित्व दाखविण्याची गरज आहे. पण दु्दैवानं आपल्यात एकी नाही.
ReplyDeleteअसं नुसते म्हणून एकी होणार नाही एकत्र व्हायला सुरुवात करा,एकाने सुरुवात केली की मागे अनेक उभे रहातात.गरज सुरुवात करण्याची असते,म्हणून स्वतः पासूनच सुरुवात करा.व्यक्त व्हा-ठासून व्यक्त व्हा.
DeleteWell said. ठळक, स्पष्ट वास्तव वादी विचार मांडले आहेत 👍
ReplyDeleteया बदलाची सुरुवात स्वतः पासून सुरू करूया.
ReplyDeleteसुरेख, उत्कृष्ट, खूपच छान लिहिले आहेस सुवर्णा.
ReplyDeleteमुळातच फॉर्मल म्हणजे शर्ट पँट आणि टाय का ???
कारण ब्रिटिश तसे घालतात.
आपल्या आजोबांच्या पिढीत सगळेच धोतर आणि नऊवारी लुगडे नेसून.
माझी आजी तर नऊ वरी घालून शाळेत शिकवत होती. त्या काळातील शिक्षिका.
😊😊😊😊😊
काळ बदलला. असो.
खूप छान लिहिले आहेस.
आहे बाढो.....
👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻